मोदींचा 'मेक इन इंडिया' आता 'रेप इन इंडिया' बनला आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी झारखंडमधील एका सभेत भाजप आणि मोदींवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसंच राहुल गांधी यांनी संसदेत माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. गोंधळ एवढा वाढला की सभागृहाचं कामकाज काहीकाळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.
माफीचा प्रश्नच नाही
या गोंधळानंतर संसदेबाहेर पडताच मीडियाशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "माफी मागण्याचा प्रश्नच नाही. मी या मुद्द्यावर माफी मागणार नाही. मुख्य मुद्दा आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी संपूर्ण ईशान्य भारत जाळला आहे. या मुद्द्यावर लक्ष विचलित करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप मला लक्ष्य करत आहेत. मी आठवण करुन देतो की, नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी दिल्लीला रेप कॅपिटल म्हटलं होतं. मी माझ्या वक्तव्याचा पुनरुच्चार करतो. नरेंद्र मोदींनी 'मेक इन इंडिया' म्हटलं होतं. आम्हाला वाटलं की वृत्तपत्रांमध्ये मेक इन इंडिया दिसेल. पण आज वृत्तपत्र पाहिली तर प्रत्येक ठिकाणी 'रेप इन इंडिया' दिसतं."
सुरजेवाला यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट
दुसरीकडे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज (13 डिसेंबर) सकाळी एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीचा उल्लेख 'रेप कॅपिटल' करत आहेत. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, 'मोदीजी, देशात सुरु असलेल्या अराजकतेवरुन लक्ष हटवण्यासाठी तुम्हीच संसदेचं कामकाज होऊ देत नाही. ध्यानात घ्या, देशातील मुलींना रेप-मनमानीविरोधात निर्णायक कारवाई हवी आहे. 'रेप इन इंडिया' मंजूर नाही आणि याबाबत स्वत:चं वक्तव्य ऐका, जर हे योग्य नाही, तर माफी मागा'.
सुरजेवाला यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये बोलत आहेत की, 'दरदिवशी दिल्लीत बलात्कारच्या बातम्या येतात. दिल्लीला रेप कॅपिटल बनवलं आहे. दिल्लीला ज्याप्रकारे रेप कॅपिटल बनवलं आहे, त्यामुळे जगात भारताचा अपमान होत आहे. तुमच्याकडे माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी ना कोणतीही योजना आहे, ना दम. शिवाय तुम्ही यासाठी काहीही करत नाहीत.'
राहुल गांधी काय म्हणाले होते?
देशात होत असलेल्या बलात्कारांच्या घटनांबाबत राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, मोदींचा 'मेक इन इंडिया' आता 'रेप इन इंडिया' बनला आहे. झारखंड आणि उत्तर प्रदेश कुठेही पाहा, अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. भाजपच्या एका आमदारावरही बलात्काराचा आरोप आहे. एवढंच नाही तर पीडितेला जाळून मारलं पण मोदींनी मौन साधलं आहे.