शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली चिन्मयानंद यांना एसआयटी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेड्या ठोकल्या. आपल्याच कॉलेजमधील कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप चिन्मयानंद यांच्यावर आहे.


चिन्मयानंद यांना शहाजहांपूरमधील मुमुक्षू आश्रमातून अटक केली. यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. आजच त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. 24 ऑगस्ट रोजी तक्रारदार विद्यार्थिनीने चिन्मयानंद यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. चिन्मयानंद यांना अटक केली नाही तर आत्महत्या करण्याची धमकी पीडित मुलीने दिली होती. विद्यार्थिनीच्या आरोपांनंतर या प्रकरणाला राजकीय रंग चढला.

मात्र चिन्मयानंद निर्दोष असून त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी असे आरोप केले जात आहे, असं चिन्मयानंद आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, प्रकृती बिघडल्याचं कारण चिन्मयानंद यांना बुधवारी (18 सप्टेंबर) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर गुरुवारी (19 सप्टेंबर) त्यांना लखनौमधील केजीएमयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र आयुर्वेदिक उपचार व्हावेत अशी चिन्मयानंद यांची मागणी होती. त्यामुळे त्यांना पुन्हा मुमुक्षू आश्रमात परत नेण्यात आलं.