नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींचा शपथविधी झाल्यानंतर आज शुक्रवारी मंत्र्यांचं खातेवाटप करण्यात आलं. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रीपद मिळालं आहे. खात्याबद्दल त्यांना विचारलं असता, खात्यामध्ये कुठला फरक नसतो, त्यामुळे मला मागे गेल्यासारखं वाटत नसल्याचं एबीपी माझाशी बोलताना दानवे यांनी सांगितलं."माझ्या खात्याचा संबंध लोकांशी आहे, त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं कारण नाही.", असंही त्यांनी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. मंत्रिमंडळात अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा सहकारी म्हणून काम करायला मिळणं हा आनंद जास्त असल्याचंही त्यांनी माझाकडे स्पष्ट केलं.


मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाचं आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री आहेत. तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्रिपद मिळालं आहे.



शिवसेनेला मिळालेल्या अवजड मंत्रिपदाबद्दल

रावसाहेब दानवेंना शिवसेनेला मिळालेल्या मंत्रिपदाबद्दल विचारण्यात आलं. "काही मंत्र्यांची खाती बदलली आहेत, ज्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही. उरलेल्या सर्वांची खाती सारखीच आहेत. त्यामुळे शिवसेनेलाही तेच खातं मिळालं आहे.

कॅबिनेट मंत्रिपद का नाही मिळालं?

अनेक पक्षाचं सरकार चालवताना नेतृत्वाला काही मर्यादा असतात. आमच्या पक्षाला सगळ्यांचा विचार करावा लागतो. आठ वेळा मंत्री असलेले सुद्धा अजून राज्यमंत्री आहेत काही. माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या दिग्गज सुद्धा राज्यमंत्री असणार आहेत. असं म्हणत त्यांनी राज्यमंत्रीपदावर समाधानी असल्याचं सांगितलं. तसंच मंत्रिमंडळात अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा सहकारी म्हणून काम करायला मिळणं हा आनंद जास्त असल्याचंही त्यांनी माझाकडे स्पष्ट केलं.

मोदी सरकारचं खातेवाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. अमित शाह यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारमण यांच्या मंत्रालयाचा खांदेपालट करण्यात आला आहे. राजनाथ सिंह संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळतील, तर निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय सुपूर्द करण्यात आलं आहे.

पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, तर नितीन गडकरी यांच्याकडील भूपृष्ठ वाहतुकीची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या स्मृती इराणी महिला आणि बालकल्याण विभागाचं कामकाज पाहतील. देशाच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला संरक्षण मंत्री राहिलेल्या निर्मला सीतारमण देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्रीही असतील. म्हणजेच महिलेने देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची तुरळक घटना यंदा घडेल. प्रकाश जावडेकर यांना पर्यावरण आणि वने विभाग पुन्हा देण्यात आला आहे.

शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग मंत्रालय आलं आहे. अनंत गितेंनंतर यंदा सेना खासदार अरविंद सावंत या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळतील. गेल्या वेळी गितेंना अवजड उद्योग मंत्रिपद दिल्यामुळे शिवसेनेत नाराजी होती.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री आहेत. तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्रिपद मिळालं आहे.

जनता दल युनायटेड मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं आहे. एक मंत्रीपद दिलं गेल्यानं जदयू नाराज असल्याची चर्चा होती. मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी दुसऱ्यांदा मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता.