बंगळुरू: आर्थिक गुन्हे न्यायालयाने 12.56 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तिला तुरुंगातच राहावं लागणार आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याने रान्या रावचा जामीन फेटाळण्यात आला आहे. 3 मार्च 2025 रोजी 34 वर्षीय रान्या रावला दुबईहून बेंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्यासह अटक करण्यात आली होती.
न्यायालयीन सुनावणीत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) रान्या रावच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. रान्या राव सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहे. त्यामुळे तिला जामीन दिल्याने तपासात अडथळे येऊ शकतात. ती पुराव्यांशी छेडछाड करू शकते किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकते असा युक्तिवाद डीआरआयने केला होता. त्याच आधारे कोर्टाने रान्या रावचा जामीन फेटाळला.
रान्या राव ही कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक IPS रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. 3 मार्च रोजी तिला अटक करण्यात आल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी रामचंद्र राव यांची काही भूमिका आहे का याचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांना तपासाचे अधिकार दिले आहेत.
प्रत्येक किलोमागे एक लाख कमिशन
रान्या राव ही कन्नड अभिनेत्री असून माणिक्य आणि पत्की या चित्रपटात तिने काम केले आहे. अंगावर, मांड्या आणि कमरेला टेप लावून रान्याने सोने लपवले होते. कपड्यांमधले सोने लपवण्यासाठी तिने मॉडिफाईड जॅकेट आणि रिस्ट बेल्टचा वापर केला होता.
एक किलो सोने आणण्यासाठी रान्याला एक लाख रुपये मिळतात, असा दावा सूत्रांनी केला. अटक होण्यापूर्वी 15 दिवसांमध्ये रान्या तीन ते चार वेळा दुबईला जाऊन आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतरच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते.
डीआरआयने गैरवर्तन केल्याचा रान्या रावचा दावा
अटकेदरम्यान रान्या राव यांनी डीआरआय अधिकाऱ्यांवर शिवीगाळ केल्याचा आरोप केला. जेव्हा तिने काही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला त्यावेळी आपल्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप रान्यात रावने केला. तसेच तिच्या संमतीशिवाय काही कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या करुन घेतल्याचा आरोपही तिने केला. डीआरआयने हे आरोप फेटाळून लावले. सर्व प्रक्रिया कायदेशीर आणि सन्माननीय पद्धतीने अवलंबण्यात आल्याचा दावाही डीआरआयने केला.
ही बातमी वाचा: