नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट अद्यापही पूर्णपणे टळलेलं नाही. पण, या संकटावर मात करण्याच्या प्रयत्नांना मात्र देशात बऱ्याच अंशी यश मिळताना दिसत आहे. एकिकडे देशात नव्यानं सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या फरकानं कमी झालेला असतानाच दुसरीकडे लसीकरणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही दिवसांतच भारतात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस देशवासियांना टप्प्याटप्प्यानं दिली जाणार आहे. याबाबतची रितसर परवानगीही केंद्रानं दिली आहे. पण, लस घेतेवेळीसुद्धा काही गोष्टी लक्षात घेणं अतीव महत्त्वाचं आहे.


(AIIMS) एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनीच (Vaccine) लसीकरणाबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. भारतात कोरोनाशी लढा सुरु असतानाच सुरुवातीला दोन लसींना मान्यता देण्यात आली आहे. यादरम्यानच आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एम्सच्या रणदीप गुलेरिया यांनी लसीकरणाबाबतच्या माहितीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जिथं त्यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. शिवाय कोरोनावरील ही लस नक्कीच यशस्वी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


रतन टाटा यांनी पुन्हा जिंकली मनं! वयाच्या 83 व्या वर्षी आजारी कर्माचाऱ्याला भेटायला पुण्यात


लसीच्या दोन्ही मात्रा तितक्याच महत्त्वाच्या


गुलेरिया यांनी स्पष्ट केल्यानुसार कोरोनापासून बचावासाठी कोणत्याही व्यक्तीला लसीच्या दोन मात्रा घेणं आवश्यक आहे. जेणेकरुन त्या व्यक्तीच्या शरीरात योग्य प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकेल. सहसा लसीची दुसरी मात्रा म्हणजेच दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी शरीरात अॅन्टीबॉडीज तयार होण्यास सुरुवात होते.


लसीबाबतची ही अत्यंत महत्त्वाची माहिती देत असताना त्यांनी परदेशी राष्ट्रांप्रमाणंच भारातातील या लसीही तितक्याच प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, येत्या 10 दिवसात कोरोनाची लस देण्यास सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली.