पुणे : रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना ते कुटुंबाचा एक भाग मानतात. अशीच एक घटना समोर आली आहे. टाटा कंपनीत काम करणारा एक कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून आजाराशी झुंजत आहे. ही बातमी टाटा यांच्या कानावर गेली आणि टाटा मुंबई ते पुणे प्रवास करीत कर्मचाऱ्याच्या घरी पोहचले.


विशेष म्हणजे ही भेट अत्यंत गोपनीय होती. ना त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक होते, ना कोणते माध्यम प्रतिनिधी. सोशल मीडियावरही यासंदर्भात काहीच माहिती नाही. यातूनच टाटा यांचा मोठेपणा दिसून येतो. आपला उद्योगसमूह वाढण्यासाठी झटलेल्या कर्मचाऱ्यांविषयी त्यांची आपुलकी यातून दिसत आहे.



मात्र, भेट दिलेल्या कुटुंबियाच्या मित्राने लिंक्डइनवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. रतन टाटा या माजी कर्मचार्‍याला भेटल्याचे चित्रदेखील या पोस्टमध्ये शेअर केले गेले आहे. पुण्यातील मुंबई फ्रेंड्स सोसायटीमधील माजी कर्मचाऱ्याला रतन टाटा भेटायला आले होते. वय वर्ष 83 असताना रतन टाटा घरी भेटायला आल्याने कुटुंब देखील या गोष्टीने भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.


लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या कंपन्यांवर रतन टाटा नाराज
कोरोनामुळे लॉकडाऊन आणि बऱ्याच गोष्टी बंद झाल्या होत्या. या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. पगार कपात करत आहेत. यावर टाटा ट्रस्टचे चेअरमन तथा उद्योगपती रतन टाटा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्‍यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवालही टाटा यांनी उपस्थित केला. ही तिच लोकं आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्यासाठी कारकीर्द देणाऱ्या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितीमत्तेची व्याख्या आहे का? असं रतन टाटा यांनी म्हटलं होतं.