नवी दिल्ली : आयुर्वेदिक उत्पादनावर 12 टक्के जीएसटी लावल्याने रामदेव बाबा नाराज झाले आहेत. करवाढ केल्याने ‘अच्छे दिन’ येणार नाहीत, अशा आशयाचे पत्रही रामदेव बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिणार आहेत.

सर्वसामान्य लोकांना उपयुक्त असलेल्या आयुर्वेदिक उत्पादनांवर 12 टक्के जीएसटीवर पुनर्विचार करावा, असे आम्ही सरकारला कळवलं असल्याचं पतंजलीचे प्रवक्ते एस के तिजारावाला यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितले.

जीएसटी येण्याआधीपर्यंत आयुर्वेदिक उत्पादनांवर जवळपास 5 टक्के कर आकारला जायचा. त्यामुळे आयुर्वेदिक उत्पादनांवर जास्त कर आकारल्यास ‘अच्छे दिन’पासून आपण दूर जाऊ. कारण चांगल्या आरोग्याशिवाय चांगल्या जीवानाचा विचार होऊच शकत नाही, असेही एस के तिजारावाला यांनी म्हटले.

रामदेव बाबा यांच्या पतंजलीमध्ये आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती केली जाते. अगदी टूथपेस्टपासून शँपू-बिस्किटांपर्यंत सर्व उत्पादनं स्वदेशी पद्धतीने बनवली जातात. ही उत्पादनं आरोग्याला हितकारक असल्याचा दावा पतंजलीकडून नेहमीच करण्यात येतो.

पतंजली नफा मिळवण्यासाठी काम करत नाही, तर सर्वसामान्य लोकांना परवणाऱ्या दरात उत्पादनं मिळावी, यादृष्टीने काम करते, असेही तिजारावाला यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी रामदेव बाबा यांनी सांगितले होते की, बाजारात टूथपेस्टमध्ये 9 टक्के हिस्सा आणि केसांच्या तेलामध्ये 8 टक्के हिस्सा एकट्या पतंजलीचा आहे. त्यामुळे आयुर्वेदिक उत्पादनांवर जीएसटी लावल्याने नाराज झालेल्या बाबा रामदेव यांची दखल केंद्र सरकार घेतं का, हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे.