नवी दिल्ली : घुसखोरीविरोधात भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने नौशेरामधील पाकिस्ताच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.


भारतील सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सैन्याने नौशेरामधील कारवाईचा व्हिडीओदेखील जारी केला आहे. पाकिस्तानचं लष्कर घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा दावाही भारताने केला आहे. बर्फ विरघळल्याने आणि पास खुले झाल्याने घुसखोरचं प्रमाण वाढल्याचं शक्यता आहे, असंही अशोक नरुला म्हणाले.

30 सेकंदात पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त

9 मेच्या कारवाईचा हा व्हिडीओ आहे. 30 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चौक्या भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्याचं दिसत आहे.

रॉकेट लॉन्चर, अँटी टँक गायडेड मिसाईल, 106 रिकॉल गन आणि ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चरच्या सहाय्याने भारतीय सैन्याने ही कारवाई केली.

'ही कारवाई दहशतवादविरोधी अभियानाचा भाग'

नरुला म्हणाले की, शेजारच्या देशाने सीमेवरील घुसखोरी थांबवावी. आम्ही नुकतीच नौशेरामध्ये जी कारवाई केली ती घुसखोरीविरोधात होती. ही कारवाई आमच्या दहशतवादविरोधी अभियानाचा भाग आहे. काश्मीरमध्ये आम्हाला शांतता हवी आहे. यासाठी सीमेवरील घुसखोरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरुन दहशतवाद्यांची संख्या कमी होईल आणि राज्यातील तरुणाई चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सीमेवर अशाप्रकारची कारवाई करतच असतो.

भारताने उरी हल्ल्याच्या 11 दिवसांनंतर मागील वर्षी 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेकी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता, ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

18 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते.

पाहा व्हिडीओ