नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळालं. आठवलेंसह 19 जणांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

 

या शपथविधीदरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रामदास आठवलेंवर एकवटलं होतं. मात्र शपथविधीदरम्यान रामदास आठवले काहीसे गोंधळलेले दिसले. शपथ वाचताना आठवले स्वत:चं नावच घेण्यास विसरले.

 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सर्व मंत्र्यांना शपथ देत होते. राष्ट्रपतींनी मी....., अशी सुरुवात करुन दिली. त्यावेळी मी .... या ठिकाणी आठवलेंनी स्वत:चं नाव घेणं आवश्यक होतं. मात्र त्यांनी नावही गाळून पुढे शपथ वाचण्यास सुरुवात केली. मात्र त्याचवेळी राष्ट्रपतींनी आठवलेंना थांबवून नाव घेण्यास सांगितलं.

 

यानंतरही शपथेचा पूर्ण मायना वाचताना आठवले अडखळत होते. त्यावेळी राष्ट्रपती त्यांना शपथ वाचण्यास मदत करत होते.

 

या शपथविधीसाठी आठवलेंनी डोक्यावर निळा फेटा बांधला होता.

 

दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळात प्रकाश जावडेकर यांना प्रमोशन मिळालं आहे. जावडेकर यांची राज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे. तर धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.