अयोध्या : राम मंदिर निर्माणाबाबत आज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची महत्त्वाची बैठक अयोध्यामध्ये पार पडणार आहे. अयोध्येतील सर्किट हाऊसवर दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आज घोषित होणार असल्याचा दावा न्यासाचे महामंत्री चंपत राय यांनी केला आहे. राम जन्मभूमीत मंदिर निर्माण कार्याची तयारी पूर्ण केली आहे. भूमिपूजनानंतर कार्याला सुरुवात होईल, ज्यासाठी न्यास आज तारखेची घोषणा करु शकतं. ट्रस्टच्या अध्यक्षांकडून भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.


न्यासाच्या अध्यक्षांनाच बैठकीचं निमंत्रण नाही
या बैठकीत न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना आमंत्रणच पाठवलं आहे. यामुळे महंत नृत्य गोपाल दास नाराज असून अध्यक्षाशिवाय बैठक कशी होईल, असा प्रश्न विचारला आहे. गोपाल दास म्हणाले की, मला कोणीही या बैठकीविषयी माहिती दिलेली नाही. मात्र निमंत्रण आल्यास बैठकीला जाईन.मात्र न्यासाच्या सदस्यांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळलं आहे. परंतु एका सदस्याने चंपत राय यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.


आजच्या बैठकीत 15 पैकी 12 सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता
आजच्या बैठकीत 15 पैकी 12 सदस्यं सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. इतर तीन सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होऊ शकतात. अयोध्येत सर्किट हाऊसमध्ये दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होईल. भूमिपूजनसह मंदिराच्या निर्माणाचं कामही सुरु होईल. दरम्यान मंदिर निर्माणाच्या तयारीला वेग आला आहे. परिसरातील तीन एकर जमिनीच्या सपाटीकरणाचं काम पूर्ण झालं असून आता पायाभरणीची तयारी सुरु आहे.


देशाच्या विविध भागात राहणारे आणि वयोवृद्ध असल्याने अनेक सदस्य अयोध्येत पोहोचू शकणार नाही. प्रमुख विश्वस्त परासरण, प्रयागराजहून वासुदेवानंद सरस्वती आणि उडपीहून स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ महाराज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी होती. यासोबतच 16 आणि 17 जुलै रोजी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र, उत्तर प्रदेश सरकारचे पदसिद्ध विश्वस्त अवनिश अवस्थी, विश्वस्त कामेश्वर चौपाल, परमानंद जी महाराज, स्वामी गोविंद देव गिरी अयोध्येत उपस्थित राहतील. तर इतर सदस्यांपैकी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, महासचिव चंपत राय सदस्य अनिल मिश्र, पदसिद्ध सदस्य जिल्हाधिकारी अनुज झा, निर्मोही आखाडाचे महंत दिनेंद्र दास आणि अयोध्या राजा विमलेंद्र मोहन मिश्र अयोध्येत आहेत.