Ram Mandir Inauguration LIVE: अयोध्या : देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यासाठी (Ram Pran Pratishtha Ceremony) उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीतील वाढलेली थंडी आणि खराब हवामान यामुळे त्यांनी सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अडवाणींनी हा निर्णय घेण्यामागे त्यांच्या प्रकृतीचं कारणंही असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या महिन्यातच या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.


विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसचिव कृष्ण गोपाल आणि रामलाल यांच्यासोबत 22 जानेवारी रोजी लालकृष्ण अडवाणींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांच्या तब्येतीबाबत चर्चा झाली होती. अडवाणींना अयोध्येत येण्यासाठी कोणती व्यवस्था करावी लागेल, त्यांना कार्यक्रमात किती वेळ बसता येईल, त्यांच्यासाठी डॉक्टर उपलब्ध असतील का? कोणीतरी त्यांच्यासोबत पूर्ण वेळ राहू शकेल का? यावर चर्चा झाली होती. तसेच, त्या अनुषंगानं लालकृष्ण अडवाणींसाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, खराब हवामानामुळे अडवाणी या सोहळ्याला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 


अडवाणींनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहू नये, चंपत राय यांनी केलेली विनंती 


राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना पुढील महिन्यात मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहू नये, अशी विनंती केली होती. ते म्हणाले होते की, दोघेही कुटुंबातील वडील असून त्यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेऊन त्यांना न येण्याची विनंती केली होती, जी दोघांनीही मान्य केली.


चंपत राय यांनी त्यावेळी बोलताना सांगितलं होतं की, अडवाणी आणि जोशी प्रकृती आणि वयाशी संबंधित कारणांमुळे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. अडवाणी आता 96 वर्षांचे आहेत आणि जोशी पुढील महिन्यात 90 वर्षांचे होतील. या सोहळ्यासाठी सुमारे 4 हजार संत आणि 2 हजार 200 इतर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. अयोध्येत सोहळ्यासाठी पाहुण्यांचं आगमन सुरूच आहे. काही तासांतच रामललाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ram Mandir Pran Pratishtha: आजि सोनियाचा दिनु! अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची विधीवत प्रतिष्ठापना; कसा पार पडेल सोहळा? पाहा संपूर्ण वेळापत्रक