मुंबई : सध्या अयोध्यानगरी रामलल्लाच्या (Ram Mandir) प्रतीक्षेत असून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच सध्या अयोध्यानगरीचं (Ayodhya) रुपडं देखील पालटलं जातंय. सोहळ्याच्या दिवशी किंवा भविष्यातसुद्धा राम भक्तांनी वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पहिल्यांदाच अयोध्येत चार मजली मल्टी लेव्हल पार्किंगची सोय करण्यात आलीये. पुण्याच्या स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक आणि मराठी उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांना या सगळ्या व्यवस्थापनाचं काम मिळालंय. 


आता अयोध्येतील पार्किंगची व्यवस्था आणि फूट कोर्टची व्यवस्था आता एक मराठी उद्योजक सांभाळणार आहे. या ठिकाणी  मल्टी लेवल पार्किंगसोबतच रुफ टॉप  हॉटेल आणि फुड मॉलच देखील काम पूर्ण होतंय. त्यामुळे अयोध्येत राम भक्तांना मराठमोळ्या महाराष्ट्रीयन जेवणाची देखील चव चाखता येईल. 


रोजगार निर्माण करुन देण्यास होणार मदत


या सर्व बाबींमुळे अयोध्येत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्यास देखील मदत होणार आहे. या तया झालेल्या पार्किंगमध्ये 300 कार आणि 1100 दुचाकी पार्क करण्याची व्यवस्था असणार आहे. तसेच इथे एक फूड कोर्टची देखील उभारणी करण्यात येईल. यामुळे मराठी जेवणाचा आस्वाद अयोध्येत घेतला जाणार आहे. 


अयोध्या नगरी सज्ज 


राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. त्यातच त्याच दिवशी संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. तसेच या सोहळ्याला अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित दर्शवणार आहेत. सध्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे काही पूर्व विधी सुरु झालेत. त्यानुसार रामल्लाची मूर्ती ही गर्भगृहात आणण्यात आलीये. 


प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण?


राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रही पाठविण्यात आली आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6 हजारहून अधिक लोक या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा दिवस भारतात एखाद्या मोठ्या सणासारखा साजरा करण्यात येणार आहे. याच दिमाखादार सोहळ्याचं निमंत्रण पत्र आता समोर आलं आहे.  


सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत नेमकं काय? 


अयोध्येत (Ayodhya) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी  पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, मंदिराच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता प्रवेश करावा लागेल. कार्यक्रम किती तास चालेल? कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे बेकायदेशीर आहे? या सर्व गोष्टी निमंत्रण पत्रात लिहिलेल्या आहेत. तसेच 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


हेही वाचा : 


Ram Mandir Inauguration: 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांत 'हाफ डे', केंद्र सरकारचा निर्णय