Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामाचं भव्य मंदीर (Ayodhya Ram Mandir) उभारलं जात आहे. अशातच या मंदिराचं काम कधी पूर्ण होणार? अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात रामाची मूर्ती कधी बसवली जाणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात आहेत. याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात रामाची मूर्ती कधी बसवली जाईल, याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2024 च्या तिसर्या आठवड्यात भगवान रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रतिष्ठापना करतील, अशी माहिती मूर्ती आणि राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या प्रमुख सदस्याने बुधवारी (15 मार्च) माध्यमांशी बोलताना दिली आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी यासंदर्भात माहिती दिली. मंदिराचं बांधकाम जोरात सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला (बाल भगवान राम) यांच्या मूर्तीची मूळ जागी प्रतिष्ठापना केली जाईल."
मंदिराचा निवडणुकीशी संबंध नाही
स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी स्पष्ट केलं की, "मंदिराचं बांधकाम आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांचा संबंध नाही. आम्ही फक्त आमचं काम करत आहोत. गोविंद देवगिरी यांनी बोलताना असंही सांगितलं की, "रामललाची मूर्ती मंदिरात स्थापित करण्यापूर्वी बराच काळ कापडी पंडालमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र आता देवतांना त्यांच्या मूळ जागेवर स्थानांतरित करण्याची वेळ आली आहे."
मूर्ती बसवल्यानंतरही काम सुरु राहणार
मूर्ती मूळ ठिकाणी स्थानांतरित झाल्यानंतरही मंदिराचं काम सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गर्भगृह, पहिल्या मजल्यावरील काम पूर्ण करुन जानेवारी 2024 पूर्वी दर्शनाची व्यवस्था करण्याचं आमचं ध्येय आहे. स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले की, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. योग, आयुर्वेद आणि भारतीय संगीत जगभर पोहोचलं असून जगभरात सांस्कृतिक क्रांती होईल."
25 मार्चनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहाय्यकाने बुधवारी बोलताना सांगितलं की, "या महिन्याच्या अखेरीस राज्य विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री अयोध्येला जाणार आहेत." 25 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर शिंदे अयोध्येत प्रभू श्रीरामाची पूजा करण्यासाठी जाणार आहेत.
मंदिरासाठी देश-विदेशातून देणगी
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचं काम जोरात सुरु आहे. यासाठी लोक सढळ हस्ते देणगी देत आहेत. दरम्यान, भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या रोख देणगीतही वाढ झाली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "राम मंदिरासाठी दिल्या जाणाऱ्या रोख देणगीत तीन पटीने वाढ झाली आहे." ते म्हणाले की, "रामजन्मभूमीत येणारे भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत."