नवी दिल्ली : सीबीआयचे माजी स्पेशल डायरेक्टर आणि गुजरात कॅडरचे 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश अस्थाना या आधी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे महानिदेशक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून ते आता बालाजी श्रीवास्तव यांची जागा घेणार आहेत. 


बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे महानिदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या राकेश अस्थाना यांची तात्काळ प्रभावाने दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केला. दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून राकेश अस्थाना यांना पुढच्या एक वर्षाचा कार्यकाल मिळणार आहे. सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर म्हणून काम केलेल्या राकेश अस्थाना यांनी त्या आधी गुजरातमध्ये सेवा केली आहे. गेल्या वर्षी त्यांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 


 






राकेश अस्थाना यांची सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर म्हणून कारकीर्द चर्चेत राहिली होती. त्यांची 2018 साली सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळचे सीबीआयचे डायरेक्टर आलोक वर्मा यांनी आणि राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने या दोघांनाही सीबीआयमधून पदमुक्त केलं होतं आणि नंतर राकेश अस्थाना यांना क्लिन चीट देण्यात आली होती. 


नुकतेच दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिल्ली पोलीस आयुक्तांच्या अधिकारात काही वाढ केली आहे. तसेच दिल्ली पोलीस आयुक्त हे थेट केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येते. त्यामुळे येत्या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राहणार असल्याचं मत काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे. राकेश अस्थांनांची नियुक्ती ही त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतं. 


महत्वाच्या बातम्या :