स्मृती इराणींना माहिती-प्रसारण मंत्रीपदावरुन हटवलं
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2018 09:41 PM (IST)
लोकसभा निवडणुकीला अवघं वर्ष उरलेलं असताना पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल केले आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अवघं वर्ष उरलेलं असताना पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल केले आहेत. स्मृती इराणी यांच्याकडून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. या मंत्रालयाचा कारभार आता राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यापुढे राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यावर केंद्रीय क्रीडा मंत्रिपदासोबतच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रिपदाचीही जबाबदारी आली आहे. त्यामुळे स्मृती इराणींसाठी हो माठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांच्याकडे असलेलं वस्त्रोद्योग मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानं आता अर्थमंत्रिपदाची अतिरिक्त धुरा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता पियुष गोयल यांच्यावर रेल्वे मंत्रायलयासोबतच अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त भार असणार आहे. अरुण जेटली जोपर्यंत पूर्णपणे फीट होत नाही तोपर्यंत अर्थ मंत्रालयाचा कारभार पियुष गोयल यांच्याकडेच असणार आहे. तर एस एस अहलुवालिया यांच्याक़डील पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार काढून त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.