नवी दिल्ली : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अरुण जेटलींसह, रविशंकर प्रसाद, जे पी नड्डा, धर्मेंद्र प्रधान यांचीही नावं या पहिल्या यादीत आहेत.

राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत कुणाची नावं?

  1. अरुण जेटली – उत्तर प्रदेश

  2. थावरचंद गहलोत – मध्य प्रदेश

  3. धर्मेंद्र प्रधान – मध्य प्रदेश

  4. मनसुख मांडाविया – गुजरात

  5. पुरुषोत्तम रुपाला – गुजरात

  6. जे. पी. नड्डा – हिमाचल प्रदेश

  7. रविशंकर प्रसाद - बिहार

  8. भूपेंद्र यादव – राजस्थान


उत्तर प्रदेशात भाजपचं वर्चस्व

एकाचवेळी केंद्रातल्या जवळपास डझनभर मंत्र्यांची राज्यसभेवरची टर्म संपते आहे. यावेळी भाजपच्या सर्वात जास्त जागा उत्तर प्रदेशातील वाढणार आहेत. उत्तर प्रदेशातील 10 पैकी 9 जागा एकट्या भाजपच्या निवडून येणार आहेत.

जेटलींना गुजरातऐवजी उत्तर प्रदेशातून उमेदवारी

अरुण जेटली आधी गुजरातमधून होते, आता उत्तर प्रदेशातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कारण गुजरातमध्ये काँग्रेसचं विधानसभेतलं संख्याबळ वाढल्यानं भाजपची एक जागा कमी झाली आहे.

धर्मेंद्र प्रधानांना मध्य प्रदेशातून उमेदवारी

विशेष म्हणजे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रधान यांना महाराष्ट्रातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. आता त्यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी मिळाल्याने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

प्रकाश जावडेकरांचं नाव पहिल्या यादीत नाही

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडकेर यांना यावेळी होम पीचवरुन म्हणजे महाराष्ट्रातून संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र तरीदेखील पहिल्या यादीत त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.

महाराष्ट्राच्या यादीबद्दल सस्पेन्स वाढला

धर्मेंद्र प्रधानांना मध्य प्रदेशातून उमेदवारी दिल्यानं महाराष्ट्राच्या भाजपच्या यादीबद्दलचा सस्पेन्स वाढला आहे. महाराष्ट्रातून भाजपचे तीन उमेदवार निवडून येणार आहेत. त्यापैकी जावडेकर, राणे हे दोघे धरले तर आणखी तिसरा कोण, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह इतर इच्छुकांना संधी मिळणार का याची उत्सुकता कायम आहे.

भाजपची पहिली यादी :