नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी (NEET) आधार कार्ड बंधनकारक नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. किंबहुना, कोणत्याही परीक्षेसाठी आधार कार्ड बंधनकारक करु नये, असेही सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत.


केंद्र सरकारनेही यावेळी सुप्रीम कोर्टाला सांगितले की, UIDAI ने सीबीएसईला आधार कार्ड अनिवार्य करण्यास सांगितलेले नाही.

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखपत्रासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, रेशनिंग कार्ड, पासपोर्ट हे ओळखपत्रही मान्य असतील, असेही सुप्रीम कोर्टाने  आदेश दिले.

गुजरातमधील एक व्यक्तीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. याच महिन्यात सीबीएसईने नीट परीक्षार्थींना आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. त्याविरोधात याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली.

दरम्यान, यावेळी सुप्रीम कोर्टाने बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबरला आधार कार्ड जोडण्यासाठीची मुदत वाढवून देण्याचेही आदेश केंद्राला दिले आहेत. जेणेकरुन नागरिकांना त्रास होणार नाही.

सध्या आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.