बंगळुरु : कर्नाटकचे लोकायुक्त पी विश्वनाथ शेट्टी यांना कार्यालयातच भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर अवस्थेत शेट्टींना मल्ल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बंगळुरुतील लोकायुक्त कार्यालयात बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. आरोपी हल्लेखोराचं नाव तेजस शर्मा असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी टुमकुरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
आरोपीला लोकायुक्तांनी चौकशीसाठी समन्स बजावला होता. चौकशीसाठी कार्यालयात दाखल झाल्यावर त्याने शेट्टींना चाकूने भोसकलं. हा वार इतका जबरदस्त होता, की भोसकल्यानंतर चाकू मोडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
बंगळुरुतील गजबजलेल्या परिसरात लोकायुक्त कार्यालय आहे. या भागात अनेक सरकारी कार्यालयंही आहेत. लोकायुक्त कार्यालय परिसरात तेजस चाकू घेऊन कसा शिरला, याचा शोध पोलिस घेत आहेत. भोसकण्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाला का, हल्ल्याचं नेमकं कारण काय, याचा तपास पोलिस करत आहेत.