नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून एका नव्या आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर अण्णा आजपासून सत्याग्रह आंदोलन करणार आहेत.


आज 23 मार्च अर्थात शहीद दिनाचं औचित्य साधून अण्णा आंदोलनाची सुरुवात करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असेल. त्याचप्रमाणे जनलोकपाल, निवडणूक सुधारणा या अण्णांच्या इतर जुन्या मागण्यांचाही यामध्ये समावेश आहे.

आज सकाळी 9 वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून अण्णा राजघाटाकडे कूच करतील. त्यानंतर शहीद पार्कला शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे.

सरकारकडून वाटाघाटीचे प्रयत्न

दरम्यान, अण्णांनी आंदोलन मागे घ्यावं, यासाठी सरकारकडून मध्यरात्रीपर्यंत वाटाघाटी सुरु होत्या.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल रात्री अण्णा हजारे यांच्याशी महाराष्ट्र सदनात चर्चा केली.

कृषी मूल्य आयोगास स्वायत्तता देण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. पण इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यावर अण्णा ठाम आहेत.

अण्णा महाराष्ट्रातून दिल्लीला रवाना होण्याआधी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोनवेळा अण्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णा आंदोलनावर ठाम राहिले.

काय आहे लोकपाल विधेयक?

-सीबीआय, सीव्हीसी, पंतप्रधान हे लोकपालच्या कक्षेत

-खटल्याचा निकाल वर्षभरात लावला जाणार

-लोकपालच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नाही

-सीबीआय संचालकांची नियुक्ती पहिल्यासारखी होईल

-लोकपालच्या नियुक्तीसाठी आठ सदस्यांची समिती

-आठ सदस्यांच्या समितीत सुप्रीम कोर्टाचे चार निवृत्त न्यायाधीश

-राष्ट्रपती लोकपालला हटवू शकतील

संबंधित बातम्या

रामलीला मैदानावर पुन्हा अण्णा हजारे!