नवी दिल्ली : देशातील तीन राज्यांमध्ये सध्या राज्यभेच्या निवडणुकीवरुन जोरदार धुमशान सुरु आहे. आमदारांची पळवापळवी, रिसॉर्ट पॉलिटिक्स, पैशांचा बाजार हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला देशात कोरोना नावाचा प्राणघातक आजार अजून आहे की नाही याबद्दल थोडी शंका वाटू शकते. पण राजकारण्यांना त्याचं काही पडलेलं दिसत नाही. कुठल्या राज्यात कशी चुरस सुरु आहे, यावर एक नजर आहे.


राज्यसभेच्या 24 जागांसाठी येत्या 19 जूनला निवडणूक होते. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य यांच्या पक्षबदलासोबत 22 आमदारांनी राजीनामा दिल्याचं नाट्य मार्चमध्येच घडलं होतं. त्यानंतर आता गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला आपले आमदार निवडणुकीआधी रिसॉर्टमध्ये ठेवण्याची वेळ आली.


कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक झाली. ती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले. किंबहुना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एक नैतिक दबावच सत्ताधाऱ्यांवर टाकला गेला. पण इतर राज्यांमध्ये मात्र ही स्थिती नाही. कोरोनाच्या ऐन संकटात होणाऱ्या या निवडणुकीत बिनबोभाट सगळं राजकारण सुरु आहे. आमदारांची पळवापळवी सुरु आहे. पैशांचा बाजार सुरु आहे.


प्रत्येक राज्यातली काय परिस्थिती आहे?


गुजरातमध्ये गेल्या पंधरा दिवसांत काँग्रेसच्या 8 आमदारांनी राजीनामे दिले. काँग्रेसला आपल्या दोन जागा जिंकण्यासाठी 68 मतांची गरज आहे. पण आता त्यांच्याकडे 65 आमदार उरलेत. तर भाजपनं तीन उमेदवार रिंगणात उतरवलेत. तिसरा उमेदवार आहे. काँग्रेसचेच माजी नेते नरहरी अमीन. त्यामुळे काँग्रेसच्या शक्तीसिंह गोहिल आणि भरतसिंह सोळंकी या दोनपैकी एका उमेदवाराचं भवितव्य धोक्यात आहे.


गुजरातमध्ये 2017 ची राज्यसभेची निवडणूकही देशपातळीवर गाजली होती. कारण तेव्हा काँग्रेसचे अहमद पटेल यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपनं बरेच प्रयत्न केले होते. तेव्हाही काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले. 9 जणांनी बाजूनं मतदान केलं नव्हतं. आाता याहीवेळा आपली ताकद टिकवण्यासाठी काँग्रेसला बरेच प्रयत्न करावे लागत आहेत.


मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य यांच्या भाजप प्रवेशानं गणितं बदलली आहेत. तीन पैकी दोन जागा भाजपच्या निवडून येऊ शकतात. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि समरसिंह सोळंकी हे उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांची एकमेव सीट सीफ आहे, दुसरे उमेदवार फूलसिंह बरैय्या यांची उमेदवारी मात्र धोक्यात आहे.


मध्य प्रदेश, गुजरातमध्ये तर भाजपने काँग्रेसचे आमदार फोडले आहेत. राजस्थानमध्ये अजून प्रत्यक्षात ते घडलेलं नाही. पण भाजपनं एक जादा उमेदवार दिल्यानं काँग्रेसला राजस्थानातही आमदार फुटण्याची भीती वाटते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे के सी वेणूगोपाल आणि नीरज डांगी हे दोन उमेदवार आहेत. जर काही धोका झाली नाही तर काँग्रेसचे दोनही उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपनं राजेंद्र गहलोत यांची एक जागा निश्चित असतानाच ओंकार सिंह लाखावत यांच्या रुपानं अजून एक उमेदवार देऊन काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवली आहे.


राज्यसभेच्या या निवडणुकीनंतर भाजपचे 11 तर काँग्रेसचे 5 खासदार वाढण्याची शक्यता आहे. राज्यसभेत भाजपचे एकूण 86 तर काँग्रेसचे 44 खासदार होतील. महाराष्ट्राच्या 7 जागांसह देशातल्या एकूण 34 जागांसाठी राज्यसभेची निवडूणक बिनविरोध झाली. पण इतर ठिकाणी मात्र सत्तेचा खेळ चालू असल्यानं घोडेबाजाराला उत आला. कोरोना संकटातही हे राजकारण थांबू शकलेलं नाहीय हे दुर्दैव आहे.