जयपूर : महिला आयोगाची सदस्या असूनही बलात्कार पीडितेसोबत असंवेदनशील वर्तणूक केल्याने एक महिला चांगलीच वादात अडकली आहे. राजस्थान महिला आयोगाच्या सदस्या सौम्या गुजर यांनी चक्क बलात्कार पीडितेसोबत सेल्फी काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 
राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी गुजर यांना याप्रकरणी लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यक्षा स्वतः या सेल्फीमध्ये दिसत आहेत.

 
जयपूरच्या उत्तरेकडील महिला पोलिस स्थानकात बलात्कार पीडितेची भेट घेण्यासाठी शर्मा आणि गुजर गेल्या असताना गुजर यांनी हा सेल्फी क्लिक केला आहे.

 
'मी त्यावेळी बलात्कार पीडितेशी संवाद साधत होते. अचानक माझ्या नकळत सौम्या यांनी सेल्फी काढले. मी अशा प्रकारांना थारा देत नाही. गुजर यांच्याकडे मी उद्यापर्यंत लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.' अशी माहिती राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी दिली आहे.

 
गुर्जर सेल्फी काढत असलेले दोन फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत. पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या कुठल्यातरी व्यक्तीने त्या सेल्फी घेत असतानाचे फोटो काढले आहेत. गुर्जर यांनी कॅमेरा धरला आहे, तर शर्मा फ्रेममध्ये बघत आहेत.


 

हुंडा न दिल्याने कपाळावर गोंदवलं 'मेरा बाप चोर है'


 

 



 

राजस्थानच्या अल्वरमधील 30 वर्षीय बलात्कार पीडितेवर तिच्या पती आणि दोन दीरांनी गँगरेप केल्याचा आरोप आहे. याच महिलेने माहेरहून 51 हजार रुपयांचा हुंडा न आणल्यामुळे तिच्या सासरच्यांनी कपाळावर 'मेरा बाप चोर है' आणि अंगावर शिव्या गोंदवल्या होत्या.

 

 

विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी गोंदवलेला मजकूर मिटवण्याचा आतोनात प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधींनीही या प्रकरणाची दखल घेतली. राष्ट्रीय महिला आयोगाला या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

 

अल्वरमधील राजगडमध्ये राहणाऱ्या जग्गू नामक युवकाशी 14 जानेवारी 2015 रोजी तरुणीचा विवाह झाल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच तिला हुंड्यासाठी त्रास देण्यात येत होता, असंही त्यांनी म्हटलंय.