नवी दिल्ली : विरोधी पक्ष सातत्याने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. भारतीय जनता पक्ष धार्मिक भेदभाव करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सिंह म्हणाले की, भारतात सर्व धर्मांना बरोबरीचा दर्जा मिळतो, त्यामुळेच आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. भारत कधीही पाकिस्तानप्रमाणे धर्माधिष्ठित देश बनला नाही.


सिंह यांच्या या वक्तव्याला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ओवैसी यांनी ट्वीट केलं आहे की, तुमचं (भाजप) सरकार देशाला धर्माधिष्ठित देश बनवू पाहात आहे. यावेळी ओवैसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचादेखील उल्लेख केला आहे.


प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी दिल्लीत एनसीसीकडून एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही (भारत ) धर्मांमध्ये भेदभाव करणार नाही, असं नेहमीच म्हणत असतो. मग आम्ही असं का करु? आपल्या शेजारच्या देशाने घोषणा केली आहे की, त्यांचा एकच धर्म आहे. त्यांनी त्यांच्या देशाला धर्माधिष्ठित देश घोषित केलं आहे. परंतु आम्ही तशी कोणतीही घोषणा केलेली नाही.


सिंह म्हणाले की, पाकिस्तानप्रमाणे अमेरिकादेखील धर्माधिष्ठित देश आहे. परंतु भारत असा देश नाही. कारण आपल्या साधू-संतांनी केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांना आपल्या कुटुंबाचा हिस्सा मानले.


सिंह म्हणाले की, भारताने कधीच अशी घोषणा केली नाही की, आपल्या देशाचा धर्म हिंदू आहे, शीख आहे किंवा बौद्ध आहे. सर्व धर्माचे लोक या देशात राहू शकतात. 'वसुधैव कुटुंबकम्' या उक्तीचे आपण कित्येक वर्षांपासून पालन करतोय. संपूर्ण देशाला हा संदेश भारताने दिला आहे.