छिंदवाडा (मध्यप्रदेश): मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे रेशनिंग दुकानात रॉकेलला आग लागल्यानं 20 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडामधील बारगी गावातील रेशनिंग दुकानात रॉकेल वाटप सुरु होतं. यावेळी दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणाता रांगा लागल्या होत्या. तसेच ज्या खोलीत रॉकेलचा साठा करण्यात आला होता तिथे देखील 50 ते 60 जण दाटीवाटीनं उभे होते. याचवेळी तिथं अचानक आग भडकली आणि क्षणार्धात संपूर्ण खोलीत आग पसरली. त्यामध्ये 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

अचानक आग लागल्यानं संपर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या संपूर्ण गदारोळात अनेक जण आतच अडकले. त्यामुळे काही जण गंभीर जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अजूनही त्या खोलीतून काही जणांना बाहेर काढणं सुरु आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. पण तोपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला. तर बरेच जण जखमी झाले होतो. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत मात्र अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.