नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सीमेलगतच्या गावांना लक्ष्य केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पाकच्या कुरापती रोखण्यासाठी या बैठकीत रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे.

राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या या बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही उपस्थित आहेत. तसंच लष्काराचे प्रमुख अधिकारीही या बैठकीला हजर आहेत.

भारतीय जवानावर हल्ले केल्यानंतर आता पाकिस्तानने सर्वसामान्य काश्मिरी जनतेवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. सांबा, रामगढ, लंगूर याठिकाणी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात 8 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14 नागरिक जखमी झाले आहेत.

दरम्यान, भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात भारताने पाकिस्तानच्या काही चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने आता नागरिकांवर हल्ले करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे.

पाकचा नापाक हल्ला, जवानांनंतर नागरिकांवरही गोळीबार, 8 जणांचा मृत्यू


आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच स्वतःची भलामण करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अरनिया भागात पाकिस्तानच्या सीमेवरुन दहशतवाद्यांनी केलेली घुसखोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत प्रवेश करणं सोपं व्हावं, म्हणूनच पाकिस्तान सैन्याकडून वारंवार हल्ले केले जातात. सध्या या भागात भारतीय सैन्य घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सडेतोड उत्तर देत आहे.