येत्या 9 डिसेंबरला रमाशंकर यांच्या मुलीचं लग्न आहे. मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच रमाशंकर यांची हत्या झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रमाशंकर यांची 24 वर्षीय मुलगी सोनियाचं 9 डिसेंबरला लग्न आहे. यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र तरीही ते मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. मात्र काल भोपाळच्या तुरुंगातून फरार होण्याआधी दहशतवाद्यांनी रमाशंकर यांची हत्या केली. सोनियासोबतच रमाशंकर यांना शंभुनाथ आणि प्रभुनाथ अशी दोन मुलं आहे. विशेष म्हणजे दोन्हीही मुलं भारतीय सैन्यात आहेत.
मानवाधिकार आयोगाची नोटीस
भोपाळ चकमक प्रकरणी मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे. मध्य प्रदेश सरकार आणि कारागृह संचालकांना सहा आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश नोटीशीमध्ये देण्यात आले आहेत.
बलिदानाचं राजकारण नको :
'आपल्या देशातील काही नेत्यांना शहीदांचं बलिदान दिसत नाही, त्यांना रामशंकर यांचं हौतात्म्यही दिसत नसेल. मात्र कृपया त्यांच्या बलिदानाचं राजकारण करु नका' असं आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे.
ओवेसींकडून प्रश्नचिन्ह:
‘ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या हातात घड्याळ कुठून आलं?, त्यांनी पायात चांगले बूट आणि चांगले कपडे घातले होते. जेलमधून फरार झालेले कैदी एवढे चांगले कपडे कसे काय घालू शकतात?’ असा प्रश्न एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.
‘मध्यप्रदेश सरकार आणि पोलिसांच्या वक्तव्यामध्ये देखील बरीच तफावत आहे. त्यामुळे या चकमकीची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याजवळ कोणतंही हत्यार नव्हतं. त्यांच्याजवळ धातूची एक वस्तू दिसून येते आहे. पण ते एखादं हत्यार वाटत नाही.’ असंही ओवेसी म्हणाले.
काय आहे प्रकरण?
सिमीचे 8 दहशतवादी रविवारी रात्री साडेतीनच्या सुमारास भोपाळ सेंट्रल जेलमधून पळाले होते. यावेळी त्यांनी जेलमधील सुरक्षारक्षकाचा गळा चिरुन त्याची हत्या केली आणि चादरीचा दोर बनवून जेलची भिंत ओलांडली होती.
दहशतवादी फरार झाल्याने भोपाळ सेंट्रल जेलच्या अधीक्षकांसह तिघांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर शहरभर हाय अलर्ट जारी करुन, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पळालेल्या दहशतवाद्यांचा तपास अत्यंत वेगाने सुरु करण्यात आला. अखेर फरार झालेल्या 8 अतिरेक्यांना भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावर गाठून कंठस्नान घालण्यात आलं.