जम्मू: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबल्या नाहीत, तर त्यांचे 10 तुकडे होतील, असा इशारा त्यांनी दिला. जम्मूच्या कठूआ भागात शहीद दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या दोन युद्धांची आठवण करुन देऊन राजनाथ सिंह म्हणाले की, ''कारगील युद्धात पाकिस्तानला माती खावी लागली. त्यामुळे भारताचा आपण युद्धभूमीत पराभव करु शकत नाही, म्हणून ते दहशतवादाचा आधार घेत आहेत. पण पाकिस्तानने वेळीच सावध व्हावे, पाकिस्तानचे यापूर्वी दोन तुकडे झालेत. जर त्यांनी आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत, तर भविष्यात दहा तुकडे होतील.'' असा इशारा त्यांनी दिला.
''दहशतवादाच्या आधारे जम्मू आणि काश्मीरचे तुकडे करण्याची स्वप्ने पाकिस्तान पाहत आहे. पण दहशतवाद हे शौर्याचं नाही,'' तर भ्याडपणाचं लक्षण आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
राजनाथ सिंह म्हणाले की, ''कारगील युद्धानंतरही अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे केला. पण त्या बदल्यात पाकिस्तानने सीजफायरचे उल्लंघन केले. पठाणकोट, उरीसारख्या घटनांमधून पाकिस्तानने सातत्याने सीजफायरचे उल्लंघन केले आहे.''