नवी दिल्ली: दिल्ली पोलीस आणि आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत दक्षिण दिल्ली परिसरातील एका वकिलाच्या ऑफिसमधून 10 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या नोटांमध्ये 2.50 कोटीच्या नोटा या नव्या असून, या प्रकरणी लवकरच मोठी अटक होण्याची शक्यता आहे.

ग्रेटर कैशाल परिसरात टी अॅन्ड टी नावाचे एक लॉ फर्मचे ऑफिस आहे. या ऑफिसवर टाकण्यात आलेल्या छाप्यात येथून तब्बल 10 कोटी रुपये जप्त करण्यात आले. यामध्ये एकूण 2.50 कोटीच्या नव्या नोटांचा समावेश आहे. या ऑफिसमधून पैसे मोजण्याची दोन मशिनही जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या छापेमारीवेळी ऑफिसचे दरवाजांना लॉक करण्यात आले होते, तसेच यावेळी फक्त केअर टेकरच उपस्थीत होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी अॅन्ड टी नावाच्या या लॉ फर्मच्या मालकाचे नाव रोहित टंडन असे असून, वकीलीचा व्यवसाय करणारे रोहित लॉबिंग ही करतात. याच वर्षी ऑक्टोंबरमध्ये आयकर विभागाने रोहितच्या नावावरील अनेक ठिकाणांवर छापेमारी केली असता, आयकर विभागाला त्याच्या विविध ठिकाणांवरुन कोट्यवधीचे घबाड हाती लागले.

या लॉ फर्ममधून जप्त करण्यात आलेली रक्कम 10 कोटीपेक्षा जास्तही असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या नोटांची मोजणी सुरु असून पोलीस आणि आयकर विभागाच्यावतीने इतर काही ठिकाणी छापे टाकण्यात येणार आहे.

दरम्यान, देशभरातील विविध कारवाईदरम्यान नव्या नोटांचं मोठं घबाड हाती लागतं आहे. कर्नाटकातील एका हवाला दलालाच्या घरावर मारलेल्या छाप्यात 5 कोटी 70 लाखांच्या 2 हजाराच्या नव्या नोटा, तर शंभर आणि वीस रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात 90 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली.  गोवा आणि कर्नाटकच्या आयकर विभागानं ही कारवाई केली.

या कारवाई दरम्यान 32 किलो सोनंही जप्त करण्यात आलं. चित्रदुर्गा जिल्ह्यातील चल्लाकेरे गावात राहणाऱ्या हवाला दलालानं घरातील बाथरूममध्ये ही काळी संपत्ती लपवून ठेवली होती.