New Chief Election Commissioner: भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील. राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेतील. 14 मे 2022 रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण होईल. विधी मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलं असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केलं असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केलं आहे. 

Continues below advertisement

Continues below advertisement

राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी 2020 साली निवडणूक आयुक्त (Election Commissioner) म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांची अशोक लवासा (Ashok Lawasa) यांच्या जागी नियुक्ती झाली होती. राजीव कुमार हे झारखंड कॅडरचे 1984 बॅचचे सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत. आता ते मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत. ते 2025 मध्ये सेवानिवृत्त होतील. 2024 च्या लोकसभा निवडणुका देखील आता त्यांच्या नेतृत्वातच होतील.

निवडणूक आयुक्त पदासाठीचा कार्यकाळ हा सहा वर्षांसाठी असतो. किंवा वयाची अट 65 वर्षांची असते.

राजीव कुमार यांचा जन्म 1960 सालचा आहे. राजीव कुमार यांनी 36 हून अधिक वर्षे शासकीय सेवेत घालवली आहेत. त्यांनी केंद्र आणि बिहार-झारखंड राज्य कॅडरमध्ये विविध मंत्रालयाचं कामकाज सांभाळलं आहे. ते 2020 साली केंद्रीय वित्त सचिव म्हणून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांची सार्वजनिक उद्यम चयन बोर्ड (PESB)चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.