वाजपेयी म्हणाले होते 'राजीव गांधींमुळे मी जिवंत!'
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2018 01:18 PM (IST)
सत्तेत असतानाही राजीव गांधींनी विरोधीपक्षात असलेल्या वाजपेयींवर उपचार करण्यासाठी हालचाली केल्या.
मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी संसदेत भाजपच्या नेत्यांना अक्षरशः धारेवर धरायचे, मात्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्याला अपवाद होता. राजीव गांधींच्या मनात वाजपेयींविषयी नितांत आदर होता. त्यामुळेच सत्तेत असतानाही राजीव गांधींनी विरोधीपक्षात असलेल्या वाजपेयींवर उपचार करण्यासाठी हालचाली केल्या. राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे ऋणानुबंध राजकीय मतभेदापलिकडचे होते. भारताच्या राजकीय इतिहासात असे संबंध कधीच पाहिले नसल्याचं अनेक जण सांगायचे. त्यामुळेच वाजपेयींच्या कठीण काळात राजीव गांधींनी त्यांना मदत केली. 'राजीव गांधींमुळेच मी आज जिवंत आहे' असं अटलजी म्हणाले होते. किडनीवरील उपचारासाठी अमेरिकेत जायला राजीव गांधी यांनी मदत केल्याची आठवण वाजपेयींनी 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर सांगितली होती. 'द अनटोल्ड वाजपेयी : पॉलिटिशियन अँड पॅरेडॉक्स' या उल्लेख एनपी लिखित पुस्तकात हा किस्सा आहे. 1984 ते 1989 या काळात राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते, तर अटल बिहारी वाजपेयी विरोधीपक्ष नेते. वाजपेयींच्या आजाराविषयी समजल्यावर राजीव गांधींनी फोन केला होता. 'राजीव गांधी त्यावेळी पंतप्रधान होते. मला किडनीचा त्रास होत आहे आणि तातडीने परदेशात उपचाराची गरज आहे, हे त्यांना कुठूनतरी समजलं. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलवून घेतलं. संयुक्त राष्ट्रसंघात भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळात माझा समावेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परदेशात उपचार घेण्यासाठी या संधीचा तुम्ही वापर कराल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. मी न्यूयॉर्कला गेलो. मी आज जिवंत असल्याचं एक कारण तेच आहे' असं अटलबिहारी वाजपेयींनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं. वाजपेयींवरील उपचार झाल्याशिवाय त्यांना परत येऊ देऊ नका, असंही राजीव गांधींनी पदाधिकाऱ्यांना बजावलं होतं.