श्रीनगर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजेपर्यंत बेळगाव विमानतळावर येईल. त्यांनतर तुपारे यांचं पार्थिव कार्वे मूळगावी आणणार आहे.

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूरचे सुपुत्र राजेंद्र तुपारे आणि पंजाबच्या तरनतारनचे गुरुसेवक सिंह यांना वीरमरण आलं.

कोण होते राजेंद्र तुपारे?

शहीद राजेंद्र तुपारे हे कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कार्वे गावचे सुपुत्र आहेत. 1983 साली जन्मलेले राजेंद्र तुपारे हे 2002 साली बेळगाव इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये रुजू झाले. सध्या ते पुंछमध्ये सीमेवर तैनात होते.

राजेंद्र तुपारे यांनी 14 वर्षे भारतमातेची सेवा केली, मात्र रविवारी शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे यांच्या पश्चात पत्नी, दोन आर्यन (वय 9 वर्षे) आणि वैभव (वय 5 वर्षे) अशी दोन मुलं आणि आई-वडील आहेत.

कार्वे गावावर शोककळा

शहीद राजेंद्र तुपारे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या चंदगड तालुक्यातील कार्वे गावावर शोककळा पसरली आहे. शहीद राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातमी

पाकच्या गोळीबारात कोल्हापूरचे सुपुत्र राजेंद्र तुपारेंना वीरमरण