श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पूँछ भागात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले. गुरुसेवक सिंग आणि राजेंद्र तुपारे या दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. शहीद राजेंद्र तुपारे हे कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कार्वे गावचे सुपुत्र आहेत.


सीमेवरील गोळीबारात महाराष्ट्रातील जवान राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे हे कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कार्वे गावचे सुपुत्र आहेत. 1983 साली जन्मलेले राजेंद्र तुपारे हे 2002 साली देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाले. 14 वर्षे त्यांनी भारतमातेची सेवा केली आणि आज शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे यांना आर्यन (वय 9 वर्षे) आणि वैभव (वय 5 वर्षे) अशी दोन मुलं आहेत.

शहीद राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव उद्या संध्याकाळपर्यंत कोल्हापुरातील चंदगडमध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. आजच्या गोळीबारात दोन सामान्य नागरिकही जखमी झाले आहेत.