Rajasthan and Jammu Kashmir Rain : सध्या देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेती पिकांनादेखील फटका बसला आहे. दरम्यान, राजस्थान आणि जम्मू काश्मिरमध्ये सध्या मुसळधार पावसामुळं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये पुराच्या पाण्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये मुसळधार पावसानं नद्यांना पूर आला आहे. अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकले असून, बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये हवामान खात्यानं सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानंतर राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला, त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजस्थानच्या जोधपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जोधपूर शहरातील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. तसेच अनेक ठिकाणी लोक अडकून पडले आहेत. या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर दजेखील मोठा परिणाम झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे नद्यांना उधाण आलं आहे. उझ नदीला पुर आल्यामुळं काही लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळताच एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरु केले. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बोटीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा मोठा फटका
महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानं गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून, पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं विदर्भाची चिंता वाढवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: