जयपूर : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकलेल्या असताना राजस्थानमधील लोकांसाठी खुशखबर आहे. वसुंधरा राजे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील वॅटमध्ये चार टक्क्यांनी कपात केली आहे, ज्यामुळे पेट्रोल-डिझेल प्रति लिटर अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गौरव यात्रेदरम्यान हनुमानगडमधील रावतसरमधील एका सभेत इंधन स्वस्त करत असल्याची घोषणा केली. यानुसार राज्यात पेट्रोलवरील वॅट 30 टक्क्यांहून 26 टक्क्यांवर आणि डिझेलवरील वॅट 22 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दोन हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
देशभरातील वाढलेल्या इंधन दरांविरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी मुख्य शहरांमध्ये नवा उच्चांक गाठला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि रुपयाची घसरण यामुळे इंधन दर वाढत आहेत.
पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका आजही कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या महिन्यात सलग नवव्या दिवशी वाढ झाली आहे. आज पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 11 पैशांनी महागलं आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर 87.89 रुपये तर डिझेल 77.09 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काळातही पेट्रोल आणि डिझेलचे दररोज वाढणारे दर थांबले होते. आता राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर असताना वसुंधरा राजेंनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या राज्यात निवडणुका त्यांनाच दिलासा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त, वसुंधरा राजेंची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Sep 2018 11:04 PM (IST)
वसुंधरा राजे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील वॅटमध्ये चार टक्क्यांनी कपात केली आहे, ज्यामुळे पेट्रोल-डिझेल प्रति लिटर अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे.
फोटो : ट्विटर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -