राजस्थानमधील अलवर आणि अजमेर या लोकसभेच्या दोन जागा, तर मांडलगढ या विधानसभेच्या जागेसाठी 29 जानेवारीला पोटनिवडणूक झाली होती. अजमेरमधील भाजप खासदार सांवरलाल जाट, अलवरचे भाजप खासदार चांद नाथ आणि मांडलगढमधील भाजप आमदार कीर्ति कुमारी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती.
काँग्रेसने पोटनिवडणुकीत तिन्ही जागा भाजपच्या गोटातून खेचून आणल्या. अलवरमध्ये काँग्रेसच्या करण सिंह यादव यांनी भाजपच्या जसवंत सिंह यांचा 1 लाख 56 हजार 319 मतांनी पराभव केला. मांडलगढ विधानसभेच्या जागेवर काँग्रेसच्या विवेक धाधड यांनी भाजप उमेदवार शक्ति सिंह हांडा यांच्यावर 12 हजार 976 मतांनी मात केली.
राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. वसुंधरा राजे सरकारच्या विरोधात जनतेने कौल दिल्याच्या भावना पायलट यांनी बोलून दाखवल्या.
विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही ममता बॅनर्जींनी भाजपला धूळ चारली. सत्ताधारी तृणमूलने नोआपाडा विधानसभेची जागा पटकावली असून उलुबेरिया लोकसभेच्या जागेवरही भाजप पराभवाच्या छायेत आहे.
बंगालमध्ये भाजप मूळं रोवण्याचा प्रयत्न करत असताना हा मोठा धक्का मानला जात आहे, मात्र भाजपला दिलासा इतकाच की तिथे काँग्रेसच्या चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे.