जयपूर : राजस्थानातील जाट नेते, जलसंपदा राज्यमंत्री सांवरलाल जाट यांना शनिवारी हृदयविकाराचा धक्का आला. जयपूरमध्ये भाजप कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत सुरु असलेल्या बैठकीत जाट अचानक बेशुद्ध पडले.


हार्ट अटॅक आल्यानंतर जाट यांना तात्काळ ग्रीन कॉरिडॉर करुन सवाई मानसिंग रुग्णालायत दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असली, तरी लवकरच ते बरे होतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सावरलाल जाट बेशुद्ध पडले, त्यावेळी अमित शाह, मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या. भाजपच्या आमदार-खासदारांसोबत पक्षश्रेष्ठींची बैठक सुरु होती.

कोण आहेत सांवरलाल जाट?

सांवरलाल जाट हे अजमेरमधून भाजपचे खासदार आहेत. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 या काळात ते मोदी सरकारमध्ये जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. अजमेर जिल्ह्यातील भिनाई विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

1993, 2003 आणि 2013 मध्ये त्यांनी राजस्थान सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं आहे.  2014 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्याकडे मंत्रिपद सुपूर्द करण्यात आलं होतं. मात्र मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली.