मुंबई : पाकिस्तानात घुसून भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचे श्राद्ध घातले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

'सध्या पितृपक्ष सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचे श्राद्ध घातले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि भारतीय लष्कराचे मन:पूर्वक अभिनंदन!' अशा शब्दात राज यांनी पंतप्रधानांविषयी गौरवोद्गार काढले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अभिनंदनासाठी फोनही केला होता. फोनवरुन त्यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि भारतीय लष्कराचेही अभिनंदन केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नरेंद्र मोदी यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे.

उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला.  भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.

कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला”, असं रणबीर सिंह म्हणाले.