मुंबई : उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक्स अर्थात दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.
या कारवाईनंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मुंबईत भाजप कार्यालयासमोर फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजप नेत्यांनी फटाक्या वाजवून, भारतीय जवानांचं कौतुक केलं.
त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.
भारत हा कणखर देश आहे, इथे दहशतवादाला थारा नाही हे पंतप्रधान मोदींनी दाखवून दिलंय. संपूर्ण देशाला भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदींचा अभिमान आहे, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.