पावसाची एन्ट्री लांबणीवर, 7 जूनला केरळात येणार
एबीपी माझा वेब टीम | 15 May 2016 09:41 AM (IST)
नवी दिल्ली : यंदा चांगल्या पावसाचं भाकित हवामान विभागानं दिलेलं असलं तरी मान्सूनचं आगमन मात्र काहीसं लांबण्याची शक्यता आहे. केरळात 7 जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल, असा अंदाज आज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातलं मान्सूनचं आगमनही थोडं लांबण्याची चिन्हं आहेत. साधारणपणे मे च्या शेवटी मान्सून केरळात दाखल होतो आणि जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सून कोकण किनारपट्टीवर प्रवेश करतो. याशिवाय 17 मे च्या आसपास म्हणजे परवा मान्सून अंदमान निकोबार बेटांवर धडकेल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.