नवी दिल्ली : कोरोना महामारीत संपूर्ण देश थांबलेला असताना रेल्वे मात्र सातत्याने धावत होती. देशभरातील कानाकोपऱ्यात अत्यावश्यक वस्तू पोहचवण्यात रेल्वेचा सिंहाचा वाटा आहे. आता रेल्वेने पुन्हा एक नवीन उंची गाठली आहे. भारतीय रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेवर पहिल्यांदाच त्रिशूल आणि गरुड या दोन लांब पल्ल्याच्या मालगाड्या यशस्वीपणे चालवल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या मालगाड्यांच्या सामान्य रचनेपेक्षा दुप्पट किंवा अनेक पटीने लांब असतात. गंभीर विभागांमध्ये मर्यादेच्या समस्येवर एक अतिशय प्रभावी उपाय देतात.


त्रिशूल हे दक्षिण मध्य रेल्वे (SCR) ची तीन मालगाड्यांचा समावेश असलेली पहिली लांब पल्ल्याची गाडी आहे. ज्यात 177 वॅगन आहेत. ही ट्रेन गुरुवारी विजयवाडा विभागातील कोंडापल्ली स्थानकापासून पूर्व कोस्ट रेल्वेच्या खुर्दा विभागात (ECR) सुरू करण्यात आली. एससीआरने गुंटकल विभागातील रायचूर ते सिकंदराबाद विभागाच्या मनुगुरूपर्यंत गरुड नावाची आणखी एक लांब पल्ल्याची गाडी चालवली. 




दोन्ही लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने औष्णिक वीज केंद्रांसाठी कोळसा लोड करण्यासाठी रिकाम्या खुल्या वॅगनचा समावेश होता.


एससीआर ही भारतीय रेल्वेमधील पाच प्रमुख मालवाहतूक करणारी रेल्वे आहे. एससीआरच्या मालवाहतुकीचा मोठा भाग विशाखापट्टणम-विजयवाडा-गुडूर-रेनिगुंटा, बल्लारशाह-काजीपेट-विजयवाडा, काझीपेट-सिकंदराबाद-वाडी, विजयवाडा-गुंटूर-गुंटकल विभागांसारख्या काही मुख्य मार्गांवर फिरतो.


यापूर्वी 2.8 किलोमीटर लांबीची 'शेषनाग' रेल्वे धावली होती
आजवर तुम्ही किती लांबीची आणि किती व्हॅगन्सची ट्रेन पाहिलीय. साधारणपणे आपण जास्तीत जास्त 30 ते 40 डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची आणि तब्बल 251 डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला आहे. सुपर पायथन 'शेषनाग' असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते. छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्टेशन दरम्यान ही ट्रेन चालवण्यात आली. यासाठी रेल्वेने चार मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या.