मुंबई: आधार कार्डावरील टॅगलाइन 'आम आदमी का अधिकार' हा शब्द हटवण्यात  आला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय भाजपच्या काही नेत्यांच्या आग्रहावरून घेतल्याचे समजते. त्यामुळे आता आधार कार्डवर 'मेरा आधार, मेरी पहचान' अशी नवी टॅगलाइन असेल. दिल्ली आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर आधार कार्डवरील टॅगलाइन बदलण्याच्या मागणीने जोर धरला होता.

 

दिल्ली भाजप अध्यक्ष अश्विनी उपाध्याय यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून ही टॅगलाइन बदलण्याची मागणी केली होती. या पत्रामध्ये त्यांनी आधार कार्ड हा प्रत्येक भारतीयाचा आधिकार असून त्याद्वारे जात, धर्म, पंथाचे उदात्तीकरण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २८ जून रोजी उपाध्याय यांना पत्रद्वारे नाव बदलण्या संदर्भाची माहिती दिली.

 

दरम्यान, बायूनिक आयडेंटिफिकेशन अथॅरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने यासंबंधित अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जुनी टॅगलाइन हटवून 'मेरा आधार, मेरी पहचान' अशी नवी टॅगलाइन अपडेट करण्यात आली आहे.

 

अश्विनी उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०१५ रोजी पत्राद्वारे आधार कार्डची टॅगलाइन बदलण्याची मागणी केली होती.