मुंबई : प्रवाशांना रेल्वेतही आता विमानाप्रमाणे स्पेशल ट्रीटमेंट मिळणार आहे. पश्चिम रेल्वेवरील राजधानी आणि दुरान्तो एक्स्प्रेसच्या एसी आणि द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास सेवा सुरु करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीने घेतला आहे.


प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी उत्तम आणि चांगल्या सुविधा कशा पुरवल्या जातील, याकडे रेल्वेकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी पहिला आणि वेगळा प्रयोग राजधानी आणि दुरान्तोसारख्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये केला जाणार आहे.

ट्रेनमधील प्रथम श्रेणीतील प्रवाशांच्या स्वागतासाठी गाडीचे अधीक्षक, सेवा कर्मचारी आणि द्वितीय श्रेणीतील प्रवाशांच्या स्वागतासाठी सेवा कर्मचारी आणि तिकीट निरीक्षक असतील.

प्रवास सुरु होण्यापूर्वी पाच मिनिट आधी प्रवाशांना ते स्वत:ची ओळख करुन देतील आणि पाण्याची बॉटल तसेच तोंड पुसण्यासाठी टॉवेल देण्यात येईल. त्यानंतर काही वेळातच प्रवाशांना खाद्यपदार्थांचा मेन्यू देण्यात येईल. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या स्वागतासाठी एक खास उद्घोषणा तयार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.