नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अण्णा हजारेंनी निशाणा साधला आहे. केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील संदीप कुमार यांच्या सेक्स स्कँडलवरुन अण्णांनी केजरीवालांच्या स्वराज्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजकारणात प्रवेशाच्या मुद्द्यावरुन अण्णा आणि केजरीवाल वेगळे झाले होते. पक्षाची स्थापना करतानाच केजरीवालांनी कार्यकर्त्यांच्या इमेजवरही लक्ष ठेवण्याची सूचना अण्णांनी केली होती.
अण्णाच्या आंदोलनात प्रमुख भुमिका केजरीवालांची
दिल्लीतील रामलिला मैदानात भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान अण्णांनी 9 दिवस उपोषण केलं होतं. मनमोहन सिंहांच्या काळात झालेल्या या आंदोलनाचा चेहरा जरी अण्णा असले तरी यात प्रमुख भूमिका केजरीवालांची होती.
आंदोलनानंतर दोघेही वेगळे झाले होते. केजरीवालांनी आपची स्थापना करुन दिल्लीत सत्ता काबीज केली तर अण्णांनी सत्तेबाहेर राहून आंदोलनाचा पवित्रा घेतला.
हेच आहे का केजरीवालांचं स्वराज ? अण्णांचा सवाल
अण्णांनी केजरीवालांच्या राजकारणाला कधीही स्विकारलं नाही. त्यांनी दिल्लीतील आप नेत्याच्या सेक्स स्कँडलनंतर केजरीवालांना यासाठी जबाबदार धरत कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचा सल्लाही दिला आहे..
"केजरीवालांनी माझा अपेक्षाभंग केला आहे. केजरीवालांचा आप पक्ष लोकांचा विश्वास जिंकेल असं मला वाटत होतं. पण गेल्या काही दिवसात आपच्या नेत्यांवर जे आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे मला खूप दु:ख झालं आहे." असं अण्णांनी केजरीवालांबद्दल बोलताना सांगितलं आहे. तसंच केजरीवालांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या चारित्र्याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.