नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने अधिकाधिक टेक्नोसॅव्ही होण्याचा आणि प्रवाशांच्य सोयीसुविधांकडे लक्ष देण्याचा चंगच बांधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यात तत्परता दाखवत आहेत. त्यामुळे रेल्वेने सुरेश प्रभू यांचं ट्विटर हँडल जनरल तिकीटांवर छापण्याचा निर्णय घेतला आहे.


 
प्रत्येक विभागातील तीन ते चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ट्विटर हँडलही रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलं आहे. कुठलीही तक्रार किंवा सूचना असल्यास या अकाऊण्टला मेन्शन करण्याचं आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे.

 
रेल्वेत वसुली करणारा शिपाई, घरातून पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत असलेलं अल्पवयीन प्रेमी युगुल, पाण्याच्या बाटलीवर अतिरिक्त रक्कम घेणारे रेल्वे कर्मचारी किंवा तान्हुल्यासाठी रेल्वेत दूधाची व्यवस्था केल्याची घटना, प्रत्येक वेळी प्रवाशांनी ट्विटरवर साद दिल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि कारवाई झाली. त्यामुळे प्रवाशांच्या मनात रेल्वेमंत्र्यांबद्दल विश्वासाचं नातं निर्माण झालं.

 
रेल्वेतील अस्वच्छता, दादागिरी, छेडछाड, जेवण किंवा पाण्याची व्यवस्था, भ्रष्टाचार अशा कुठल्याही तक्रारीचं निवारण करण्याचं आश्वासन रेल्वेतर्फे देण्यात आलं आहे.