नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांनी निवडून दिलं आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असं विधान बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने केलं आहे. आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षाचं वावडं नसल्याचंही शाहरुखने स्पष्ट केलं आहे.
धार्मिक असहिष्णुता ही सर्वात वाईट असून त्यामुळे भारताची वाटचाल अंधाराकडे होत असल्याचं वक्तव्य गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शाहरुखने केलं होतं. त्यानंतर शाहरुखविरोधात भाजपसह अनेक स्तरातील व्यक्तींनी टीकेची झोड उठवली होती.
'एकदा आपण आपल्या देशाचा नेता निवडला की त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायलाच हवा. मग तो कुणीही असो. आपल्या देशाने बहुमताने त्यांना निवडलं असतं. त्यामुळे नकारात्मकता पसरवण्यापेक्षा त्या व्यक्तीला पाठिंबा देऊन देश पुढे नेण्यास मदत करायला हवी.' असं मत 'इंडिया टीव्ही' चॅनेलवरील 'आप की अदालत' या कार्यक्रमात शाहरुखने व्यक्त केलं आहे.
'असहिष्णुतेवरील माझ्या वक्तव्याचा विनाकारण संबंध जोडण्यात आला' असा पुनरुच्चारही किंग खानने केला. 'मला या देशाने सर्व काही दिलं आहे, माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होतं, मग हा देश माझ्यावर अन्याय करतोय, असा विचार मी करुच कसा शकेन' असा सवाल शाहरुख विचारतो.
'माझं कुटुंब हा छोटा भारतच आहे. मी जन्माने मुस्लीम, माझी पत्नी हिंदू, माझी तीन मुलं तीन वेगवेगळ्या धर्मांचं पालन करतात.' असंही शाहरुख सांगतो.