Coromandel Train Accident: ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasore Train Accident) येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानं संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातानंतर (Accident), रविवारी (4 जून) ओडिशा पोलिसांनी एक निवेदन जारी केलं. त्यामध्ये म्हटलंय की, काही सोशल मीडिया अकाउंटवरुन ओडिशा रेल्वे दुर्घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, यावेळी रेल्वे अपघाताबाबत कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.


ओडिशा पोलिसांनी (Odisha Police) आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या सोशल मीडिया पोस्टद्वारे समुदायांना एकमेकांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.


ओडिशा पोलिसांकडून निवेदन जारी 


ओडिशा पोलिसांनी निवेदनात म्हटलं आहे की, "ज्या व्यक्ती अपघाताबाबत खोट्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी असं करणं तात्काळ थांबवावं. खोट्या अफवा पसरवून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. रेल्वे अपघाताबाबत सखोल चौकशी सुरू आहे."


ओडिशा दुर्घटनेनंतर 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना


ओडिशाच्या भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर  येथील अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन मालगाढी रवाना झाली. 


यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केलं की, "अपघातग्रस्त डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. या भागातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे." तसेच, या ट्वीटनंतर काही वेळानं त्यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आणि सांगितलं की, अप-लाईनवरही ट्रेनची वाहतूक सुरू झाली आहे."


ओडिशा अपघातात 275 जणांचा मृत्यू 


दरम्यान, कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मुख्य मार्गाऐवजी लूप लाईनमध्ये गेल्यामुळे तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. त्यानंतर कोरोमंडलवर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस जाऊन धडकली. या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक अपघात असल्याचं बोललं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Odisha Train Accident: ओडिशा दुर्घटनेनंतर 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना; रेल्वेमंत्र्यांची हात जोडून प्रार्थना, पाहा Video