रेल्वे खात्यातच आणखी एक लाख 30 हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहितीही गोयल यांनी दिली. विशेष म्हणजे मुलाखतीविना फक्त संगणकीय परीक्षा देऊन उमेदवारांना नोकरी मिळवता येणार आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं.
साडेनऊ ते दहा हजार आरपीएफ जवानांची भरती नजीकच्या काळात होणार आहे. त्यापैकी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील. गोयल यांच्या निर्णयामुळे रेल्वे पोलिसात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे मंत्रालयातर्फे पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात गोयल यांनी रोजगाराची हमी दिली. त्याशिवाय पाटणा-दिघा रेल्वेमार्गासाठी 71.25 एकर जमिनीचं हस्तांतरण केलं.
सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाची स्थानकं आणि ट्रेन्समध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचंही पियुष गोयल यांनी सांगितलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही गोयल यांनी स्तुतिसुमनं उधळली. राज्यात वेगानं होणारं विद्युतीकरण पाहता वर्षअखेरपर्यंत बिहारमधील प्रत्येक घरात वीज पोहचेल, असा आशावाद गोयल यांनी व्यक्त केला.