तिरुवअनंतपुरम : दक्षिण भारतातील राज्य केरळमध्ये पाऊस आणि महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 55 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हेलीकॉप्टरने पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
राजनाथ सिंह यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. एर्नाकुलम, त्रिशूर आणि वयानड जिल्ह्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय या भागात 14 ऑगस्टपर्यंत रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.
केरळमध्ये या नैसर्गिक संकटामुळे मोठं नुकसान झालं असल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं. घर आणि जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पीडितांसाठी केरळ सरकारने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये दिले जाणार आहेत.
भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय सेना, नौसेना आणि तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. एसडीआरएफच्या माहितीनुसार, 580 घरं काही प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत, तर 44 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. सोबतच 1301 हेक्टर क्षेत्रातील पिकं नष्ट झाली आहेत.
आजची परिस्थिती काय?
स्कायमेटच्या अंदाजानुसार, केरळमध्ये आज पावसापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर उत्तराखंडमधील चंपावत, पिथौरागड, नैनीताल, अल्मोडा, हरिद्वार, देहरादूनसह दक्षिण भागातील शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ढगफुटीची शक्यता असल्यामुळे अचानक पूरपरिस्थितीही निर्माण होऊ शकते. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील नाहन, शिमला, सोलन, मंडी आणि धर्मशाला या भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कठुआ, जम्मू आणि राजौरी म्हणजे दक्षिण जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केरळमध्ये पावसाचा हाहाःकार, मृतांचा आकडा 37 वर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2018 05:31 PM (IST)
आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 55 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हेलीकॉप्टरने पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -