Railway Accident : राजस्थानमधील (Rajasthan) पाली येथे बांद्रा-टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस (Bandra Terminus-Jodhpur Suryanagari Express) चे 11 डब्बे सोमवारी पहाटे रुळावरून घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे 3.27 वाजता झाला. राजस्थानमधील जोधपूर विभागातील राजकियावास-बोमाद्रा सेक्शनवर (Rajkiawas-Bomadra section) रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरल्याचे उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले. या दुर्घटनेत जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. सीपीआरओने सांगितले की, उत्तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि इतर उच्च अधिकारी रेल्वेच्या जयपूर मुख्यालयात या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहोचतील. यासोबतच रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
जोधपूर
0291- 2654979(1072)
0291- 2654993(1072)
0291- 2624125
0291- 2431646
पाली मारवाड
0293- 2250324
रेल्वे वाहतूक विस्कळीत
राजस्थानमधील पाली येथे वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानंतर या मार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेनंतर उत्तर पश्चिम रेल्वेने दोन गाड्या रद्द केल्या आहेत. या अपघातामुळे अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 14 गाड्यांना या अपघाताचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
हजारो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले
राजस्थानमध्ये झालेल्या या रेल्वे अपघातामुळे हजारो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही प्रवाशांनी प्रवास रद्द केला, तर जे घराबाहेर गेले होते, त्यांना मार्ग बदलल्याने वाटेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
रद्द केलेल्या गाड्या
1. ट्रेन क्रमांक 14821, जोधपूर-साबरमती ट्रेन सेवा 02.01.23 रोजी रद्द
2. ट्रेन क्रमांक 14822, साबरमती-जोधपूर रेल्वे सेवा 02.01.23 रोजी रद्द
जीवित किंवा वित्तहानी नाही
राजस्थानमधील पाली येथे वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले की, रेल्वेचे 11 डब्बे रुळावरून घसरले असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ट्रेनमधील एका प्रवाशाने न्यूज एएनआयला सांगितले की मारवाड जंक्शनवरून ट्रेन सुटल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच ट्रेनच्या आत मोठा आवाज झाला. त्यानंतर दोन तीन मिनिटांनी गाडी थांबली. यावेळी रेल्वेचे स्लीपर कोचचे डब्बे रुळावरून घसरल्याचे दिसले. घटना घडल्यानंतर 15 ते 20 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचली.
इतर बातम्या