नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आजपासून दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राहुल गांधींनी हा दौरा सुरु केला आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतल्याने लिंगायत समजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राहुल यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पाचव्या टप्प्यात तीन आणि चार एप्रिलला शिवमोगा, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकुर आणि रामनगर जिल्ह्यात राहुल गांधी जाणार आहेत.

राहुल गांधींनी कर्नाटकात पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार येडीयुरप्पा यांच्यावरही निशाणा साधला. अमित शाह यांनी चुकून येडीयुरप्पांना नंबर वन भ्रष्टाचारी म्हटले होते. त्या विधानावरुनही राहुल गांधींनी भाजपचा समाचार घेतला.

या दौऱ्यात राहुल गांधी सिद्धगंगा मठाचे शिवकुमार स्वामी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते उद्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील होलालाकेरेचा दौरा करुन, तुमकुर जिल्ह्यातील सिद्धगंगा मठात जातील. त्यानंतर दिल्लीला रवाना होण्याआधी राहुल गांधी रामनगर जिल्ह्यातील मगादीत सभा घेतील.

सिद्धगंगा मठ हे लिंगायतांचं सर्वात मोठं मठ मानलं जातं. मठाचे प्रमुख संत शिवकुमार स्वामी हे रविवारी 111 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मठात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. शिवकुमार स्वामींना लिंगायत समाज ईश्वराचं रुप मानतो. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही त्यांची भेट घेतली होती. मात्र कर्नाटकातील काँग्रेस सरकारने लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने, काँग्रेसबद्दल सकारात्मक भावना लिंगायतांमध्ये पाहायला मिळते आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि सिद्धगंगा मठाचे प्रमुख संत शिवकुमार स्वामी यांची नियोजित भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

काँग्रेस सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. भाजपला भीती आहे की, सिद्धगंगा मठाचे अनुयायी काँग्रेस सरकारच्या निर्णयामुळे भाजपपासून दूर होऊ नयेत. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी या मठाच्या प्रमुखांची भेट घेतली होती.

विशेष म्हणजे, मुरुगा मठाने तर अमित शाह यांना पत्र लिहून काँग्रेसची स्तुती केली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीशी धाकधूक पाहायला मिळते आहे. त्यामुळे एकंदरीतच राहुल गांधी यांचा कर्नाटकमधील हा दौरा भाजपसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.