पणजी : गोव्यात राफेल वरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या युद्धात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील उडी घेतली आहे. लोकशाही भाजपला निराश करते. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा नियोजन करून, मुद्दामहून व संघटीतपणे केलेला हल्ला होता. भाजपने दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे, असा आरोप असलेली पोस्ट  राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकून त्याला राष्ट्रीय वळण दिले आहे.

आपल्या फेसबुक वॉलवर राहुल गांधी यांनी गोव्यातील घटनेचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. सोबत भाजपने केलेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. गोव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे भ्याड व त्यांच्या दिल्लीत बसलेल्या बॉसना काँग्रेस घाबरत नाही, असेही गांधी यांनी स्पष्ट केले.


गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी गांधीगिरीचे प्रदर्शन, धाडस व साहसा याबद्दल मला अभिमान आहे. अशा घटनांमधून आम्ही कोण आहोत, ते अधोरेखित होते. देशात अहिंसक काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या यंत्रणेला व सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला सल्ला देण्याची आवश्यकता आहे, असा टोला गांधी यांनी लगावला आहे.

शुक्रवारी राफेल प्रकरणी काँग्रेसचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपने काँग्रेस भवनसमोर मोर्चा आणला होता. त्यावेळी भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर भाजप व काँग्रेसने परस्परविरोधी तक्रारी पणजी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आल्या आहेत. भाजपकडून राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला.